कलौ श्रीपादवल्लभः

  

 

   


कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन: ।

द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ: ॥

     प्रभू दत्तात्रेयांचा  कलियुगातील प्रथम पूर्णावतार  म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ अवतार विख्यात आहे ; ७०० वर्षांपूर्वी भाद्रपद शुक्लपक्ष ( गणेश चतुर्थी) याच  दिवशी प्रभूंनी पृथ्वीतलावर अवतार घेतला. 
 ज्याज्यावेळेस साधुसज्जनांवर अन्याय अत्याचार झाले ;  तेव्हा तेव्हा  परमेश्वराने दुष्टदुर्जनांचा नाश करण्यासाठी  अवतार घेतला आहे.  सृष्टीतत्वाचे अतिक्रमण करून अत्रीऋषी प्रसिद्ध झाले..तर कोणत्याही प्राणिमात्राविषयी लवमात्र द्वेष आणि असूया नसल्यामुळे अनुसूया माता विख्यात झाली..!  या कलयुगात भक्ताचा उध्दार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रम्हा, विष्णु, शिव या त्रिमूर्तीनीच अत्री -अनुसूया यांच्या उदरी  श्री दत्तात्रय प्रभूंचा  अवतार घेतला. यातील विष्णूमूर्तीच दत्त त्रिमूर्ती म्हणून नामरूपास आली ..! 

श्रीपादांचा जन्म :-  

श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म  हे  एक मोठेच रहस्य आहे ; साक्षात अठरा पुराणे अनादी अनंत वेदसुद्धा ज्याठिकाणी 'नेती-नेती' म्हणून गप्प बसले तेथे आपल्यासारख्या सामान्यांची बिशाद ती काय ..?
त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्री काठक चयन यज्ञ संपन्न केला होता ; हा यज्ञ पूर्ण झाल्याबरोबरच आकाशातील सूर्यमंडळातून तेजाचा शक्तिपात श्री क्षेत्र पिठापूर ,   श्री क्षेत्र कुरवपूर व  श्री क्षेत्र   मल्लिकार्जुन शिवलिंग या ठिकाणी झाला होता सर्वांच्या डोळ्यादेखत एक तेजाचा गोळा मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन झाला होता ; या यज्ञाच्या फलस्वरूपच आपला अवतार झाल्याचे स्वतः श्रीपादानी आपल्या चरित्रामृतात वारंवार सांगितले आहे ..!
श्रीपाद श्रीवल्लभ ख्रिस्त शके (इसवी सण ) १३२० ला ब्रह्मश्री घंडिकोटा अप्पालराज शर्मा  व अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय संतान म्हणून जन्मले. श्रीपाद श्रीवल्लभांना श्रीधर राज शर्मा व रामराज शर्मा हे दोघे भाऊ आणि श्रीविद्याधरी, राधा आणि सुरेखा या तीन बहिणी होत्या. ब्रह्मश्री मल्लादी बापन्नावधानुलु आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती राजमांबा हे मातामह-मातामही(आजी -आजोबा) होत.
 इ. स. १३२० मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पीठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राम्हण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी-अभ्यागताची  ती मनोभावे सेवा करीत असे. दोघेही सत्वगुणी होते. ती श्रीविष्णूची आराधना-उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी  घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राम्हण अद्याप यावयाचे होते. दारी आलेला अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून  श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथीवेषातील श्रीदत्तात्रेयांनी तीन शिरे, सहा हात अशा स्वरुपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने  श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला.प्रसन्न झालेले श्रीदत्तात्रेय तिला म्हणाले, "माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग."

श्रीदत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्त्प्रभूंना म्हणाली, "भगवंता, आपण मला 'जननी' म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून दोन पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य, परमज्ञानी, देवस्वरूप असा पुत्र व्हवा." सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीदत्त्प्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, "माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तुम्ही तो जे  सांगेल तसे करा. नाहीतर, तो तुमच्याजवळ राहणार नाही.  हा पुत्र तुमचे सगळे दैन्य-दुःख दूर नाहीसे करेल." असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरुपी श्रीदत्तात्रेय अदृश्य  झाले. हा  वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला.

काही कामासाठी बाहेर गेलेला आपळराजा घरी परतले . सुमतीने त्यांना  सगळी हकीगत सांगितली. मध्यानकाळी कोणी अतिथी आल्यास त्यला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्रीदत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्रीदत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीगत ऐकून आपळराजा अतिशय आनंदित झाले . ते  सुमतीला म्हणाले , "तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले. कारण आज आपल्याकडे श्रीदत्तरुपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर एका शुभदिवशी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) सुमती प्रसूत झाली.  तिला  एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. प्रसूतीसमयी श्रीपादांचा अवतार हा ज्योतिरूपाने झाला होता . आपळराजाणी  खुप दानधर्म केला. विद्वान ब्राम्हणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. 'हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरु होईल.' असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात  घेऊन त्या नवजात बालकाचे नाव 'श्रीपाद' असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा व सुमती यांने समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते.

वयाच्या १६ वर्षापर्यंत श्रीपाद माता-पित्यांसोबत राहिले त्यांनतर आपल्या सामर्थ्याने आपल्या  दोन्ही  मोठ्या बंधूंचे अंधत्व आणि अपंगत्व  करून त्यांनी हिमालयाकडे प्रयाण केले त्यांनतर ते भ्रमण करीत करीत कुरवपूर येथे स्थायिक झाले व त्याच ठिकाणी त्यांनी महापरिनिर्वाण केले ...!

परम पवित्र अशा भारतवर्षात भगवंताच्या अनेक अवतारांच्या राशी होऊन गेल्या, परंतु भगवान दत्तात्रेय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव या भूतलावर वास्तव्य करत असतात. स्मरण करताच प्रत्यक्ष होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात, म्हणून त्यांना स्मर्तृगामी म्हणतात.श्रीपादांनी  ३०- ३५ वर्षाच्या जीवनावतारात  अनेक अचाट लीला केल्या ज्यांचा कुठे थांगच नाही ; या त्यांच्या लीला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात वर्णित केल्या आहेत. 

श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली, आणि नंतर त्याचा तेलुगु भाषेत अनुवाद केला. मूळ प्रतीमध्ये  "हे चरित्र बापन्नाचार्युलुच्या( श्रीपादांचे आजोबांच्या) ३३व्या पिढीत प्रकाशित होईल." असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या ३३वी पिढी चालू आहे. शंकर भट्ट हे श्रीपाद प्रभूंचे समकालीन होते त्यांनीच प्रभूंचे चरित्र लिहिले  आहे..!

हरिभाऊ जोशी निटूरकर महाराज 


प. पू. श्री हरिभाऊ जोशी निटुरकर हे महान दत्तसंप्रदायिक सत्पुरूष आहेत. त्यांना श्रीगुरूंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत मराठी भाषेत भाषांतरीत केले. भारतात अनेक दत्तसांप्रदायिक हे मराठी भाषिक आहेत. त्यांच्यावर फार मोठे उपकार त्यांनी केलेले आहेत. श्री भाऊमहाराज हे श्री दत्तमहाराज कविश्र्वरांचे कृपांकीत आहेत. अत्यंत जीर्णावस्थेत असलेल्या मूळ ग्रंथाची व्यवस्थितपणे दुसरी प्रत तयार करून, मूळ "चरित्रामृतात" सांगितल्याप्रमाणे विजयवाड्याजवळ कृष्णा नदीत विसर्जन केले. नव्या प्रतिचे इ. स. २००१ साली विजयादशमीपासून अश्र्विन कृष्ण ११पर्यंत पिठापूर येथील "श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान" येथे श्रीपादांच्या सान्निध्यात पारायण करून संस्थानला अर्पण केली. हा अक्षरसत्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक अक्षर शक्ति-युक्त आहे. या ग्रंथात अतिशयोक्ति किंवा अनावश्यक वर्णन कोठेच नाही. ग्रंथाचे पारायण करताना लिलावर्णानी मती कुंठित होते तसेच अष्टभाव जागृत होतात. 

पीठापूर येथील पादुका 


महासंस्थान मंदिर 


श्रीपादांची भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने:-

१)    माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सुक्ष्म रूपात असतो.

२)    मनो वाक् काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो.
३)    श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन मध्यान्ह काळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे.
४)    सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.
५)    (अन्न हेच परब्रह्म-अन्नमोरामचंद्राय) अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास, मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो.
६)    मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.
७)    तुमचे अंत:करण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.
८)    तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल.
९)    तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह/आशिर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे, तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो.
१०)    श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही. सकल देवता स्वरूप समस्त शक्तिचे अंश मिळून माझे विराट स्वरूप, अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल.
११)    श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी, महासिद्धपुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत.
१२)    तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा, कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो.

या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे कि यात अनेक घटना भविष्य काळात घडणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ:

(१)    हा ग्रंथ मल्लादि बापन्नावधानुलु (श्रीपादांचे मातामह) यांच्या ३३व्या पिढीत प्रकाशित होईल. आता सध्या श्री मल्लादि गोविंद दीक्षितुलु हे मल्लादि बापन्नावधानुलुचे ३३वे वंशज आहेत. त्यांनीच हा ग्रंथ संस्थानला दिला.
(२)    मी पुढचा अवतार कारंजा येथे नृसिंह सरस्वती या नावाने घेईन. माझे स्वरूप माझ्या मातामहासारखे असेल. तेथून मी गंधर्वपूर व पुढे कर्दळीवनात जाई. तेथे ३०० वर्षपर्यंत समाधीत राहीन व नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुर (अक्कलकोट) येथे प्रकट होईन.
(३)    माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील.
(४)    माझे दुसरे बंधू श्रीराम शर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होईल.
(५)    श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली माणिकाची माला "माणिक प्रभू" होतील. याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आला आहे.

 श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’  हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे. आज रोजी पिठापूर आणि कुरवपूर या दोन्ही ठिकाणी महासंस्थान दिमाखात उभे आहे ; हजारो - लाखो भक्त मुग्यांप्रमाणे रांग लावून दर्शन घेत आहेत ; दररोज विविध चमत्कार संस्थानात घडतात. 

श्रीपादश्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या पारायणाचे फळ:-

श्रीपाद श्रीवल्लभ अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते. त्या नक्षत्रापासून सत्ताविसावे नक्षत्र  हस्त असताना कुरवपुरात अदृश्य झाले.

जन्म पत्रिकेप्रमाणे २७ नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवं ग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त 'मंडल' दीक्षा घेतात. एका 'मंडला' मध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते.मन बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडीत असतात. त्याचे प्रकंपन वेगळ्या चाळीस दिशांमध्ये  प्रसरण पावतात. या चाळीस दिशामधून होणारे प्रकम्पन थांबून श्रीपाद प्रभुकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते अवश्यक बद्ल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. त्या नंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व ईच्छा पूर्ण  होतात.

|| श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो |


horseshoe crab marathi ;  marathi book marathi books online marathi ebooks marathi books pdf marathi sites marathi website pik vima online marathi stories marathi katha  marathi kadambari free download mantra sangrah mayboli mayboli शेतकरी आत्महत्या माहिती सात बारा कसा शोधायचा pubg ban in india showik chakrabarty call of duty oppo f17 price india redmi 9a price in india 

worldcup fifa 


टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या