(self-discipline and success in marathi)
तुमच्या आयुष्यातील यश हे तुम्ही कोणत्या गोष्टी करता किंवा मिळवता, त्यापेक्षा तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती होता त्यावर अवलंबून असतं. ऐरिस्टॉटलने लिहिल्याप्रमाणे, “आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट आहे चारित्र्याचा विकास.” ह्या लेख माले मध्ये एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी शिस्तीचा विकास कसा करावा, तिचा वापर कसा करावा हे तुम्ही शिकाल. आत्मगौरव, स्वतःबद्दलचा आदर आणि स्वाभिमान कसा वाढवावा ह्याचं अध्ययन तुम्हाला करता येईल. वैयक्तिक महानतेसाठी अत्यावश्यक शिस्त कशी बाणवावी आणि त्या शिस्तींची तुमच्या स्वतःच्या चारित्र्यात आणि व्यक्तिमत्त्वात घडण कशी करावी हे तुम्ही शिकाल.
“पहिला आणि सर्वोत्तम विजय म्हणजे स्वत:ला जिंकणं.”- प्लेटो
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातं काही लोक इतरांपेक्षा बरंच अधिक का मिळवतात? मानवी इतिहासात काही अत्यंत चांगल्या विचारवंतांचा ह्या प्रश्नाने ठाव घेतला आहे. २३०० वर्षांपेक्षाहूनही अधिक काळापूर्वी ऐरिस्टॉटलने लिहून ठेवलं की आनंदी होणं हे मानवी आयुष्याचं अंतिम ध्येय आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने एका मोठया प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे तो म्हणजे, “आनंदी होण्यासाठी आपण कोणत्या प्रकारे जगावं?”
हा प्रश्न स्वत:ला योग्य तऱ्हेने विचारून त्याचं उत्तर देण्याची तुमची क्षमता - आणि नंतर तुमचं उत्तर तुम्हाला जिथे घेऊन जातं तिथे जाणं - तुम्ही तुमचा आनंद मिळवू शकता की नाही आणि किती लवकर मिळवू शकता, हे निश्चित करेल.
स्वत:च्या वैयक्तिक व्याख्येपासून सुरुवात करा. यशाची व्याख्या तुम्ही कशी करता? तुम्ही जर एखादी जादूची छडी फिरवू शकलात आणि तुमचं आयुष्य प्रत्येक प्रकारे परिपूर्ण करता आलं, तर ते कसं भासेल?
तुमच्या आदर्श जीवनाचं वर्णन करा. तुमचं काम, व्यवसाय आणि करिअर जर हरप्रकारे आदर्श असेल, तर ते कसं दिसेल? तुम्ही काय करत असाल? कोणत्या प्रकारच्या कंपनीसाठी तुम्ही काम कराल? तुमचं स्थान काय असेल? तुम्ही किती पैसे कमवाल? कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर तुम्ही काम कराल? आणि विशेषतः, तुमचं परिपूर्ण करिअर घडवायला तुम्हाला सर्वसाधारणपणे काय करणं आवश्यक असेल?
तुमचं कौटुंबिक जीवन जर प्रत्येक दृष्टीने परिपूर्ण असेल, तर ते कसं असेल? तुम्ही कुठे राहाल, आणि कशा प्रकारे तुम्ही राहात असाल? तुमची आयुष्य जगण्याची पद्धती कोणती असेल? तुमच्या कुटुंबियांबरोबर कोणत्या प्रकारच्या गोष्टी करायला आणि असायला तुम्हाला आवडेल? जर तुमच्यावर काही मर्यादा नसतील आणि तुम्हाला जादूची छडी फिरवता आली, तर तुम्ही तुमचं वर्तमानकाळातलं आयुष्य कोणत्या प्रकारे बदलाल?
तुमचं आरोग्य जर परिपूर्ण असेल, तर त्याचं वर्णन तुम्ही कसं कराल? तुम्हाला कसं वाटेल? तुमचं वजन किती असेल? तुमच्या आरोग्य आणि उत्तम शरीरप्रकृतीच्या पातळ्या आज आहेत त्यापेक्षा वेगळ्या कशा असतील? मुख्य म्हणजे, तुमच्या आरोग्य आणि ऊर्जेच्या आदर्श पातळ्या गाठण्यासाठी कृतिशील होण्यासाठी तुम्ही ताबडतोब कोणती पावलं उचलाल?
तुमची आर्थिक परिस्थिती जर आदर्श असती, तर तुमच्या बँकेत किती पैसे असतील? प्रत्येक महिन्याला तुम्ही किती कमावत असाल आणि प्रत्येक वर्षी तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला किती उत्पन्न मिळत असेल? आर्थिकदृष्ट्या तुम्हाला पुन्हा कधीच चिंता करावी लागणार नाही इतके पुरेसे पैसे जर तुमच्याकडे असते, तर ते किती असतील? तुमचं आदर्श आर्थिक जीवन निर्माण करण्याची सुरुवात आजपासूनच करण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलाल?
तुम्हाला जे पाहिजे तेच करा
यशाची एक लोकप्रिय व्याख्या आहे, “आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं जगता येणं, फक्त आपल्याला हव्या त्याच गोष्टी, आपण निवडलेल्या लोकांसोबत, आपल्याला हव्या त्या परिस्थितीत करता येणं.”
प्रत्येक प्रकरणात ‘यश’ म्हणजे तुमच्यासाठी काय आहे ह्याची जेव्हा तुम्ही व्याख्या करायला सुरुवात करता, तेव्हा तुमचं आदर्श आयुष्य निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत, त्या तुम्हाला ताबडतोब आढळून यायला लागतात. आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने जायला सुरुवात करण्यापासून तुम्हाला मागे ओढून धरणारी कोणती मोठी गोष्ट असेल तर ती आवडत्या सबबी देणं आणि स्वयंशिस्तीचा अभाव.
तुम्ही काय करायला पाहिजे ते तुम्हाला माहीत नसतं अशातला भाग नाही, पण तुम्ही जे करायला पाहिजे ते तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला करायला लावण्याची शिस्त तुमच्याकडे नसते
शिखरावरच्या २० टक्क्यांत सहभाळी व्हा
आपल्या समाजात शिखरावरचे २० टक्के लोक ८० टक्के पैसा कमावतात आणि ८० टक्के श्रीमंतींची आणि नफ्याची मजा लुटतात. विल्फ्रेडो पॅरेटोने १८९५ मध्ये हे तत्त्व प्रथम शोधून काढलं आणि मग ह्या ‘पॅरेटो तत्त्वा’ची सत्यता पुन्हा पुन्हा पटत गेली. तुम्ही निवडलेल्या कार्यक्षेत्रात शिखरावरच्या २० टक्केवारीत समाविष्ट होणं, तुमच्या करिअरचं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे.
२१ व्या शतकात ज्ञान आणि कौशल्य यांना अधिक महत्त्व आहे. तुम्ही जेवढे अधिक ज्ञान मिळवाल आणि अधिक कौशल्यांचा वापर कराल तेवढे तुम्ही अधिक समर्थ आणि मौल्यवान व्हाल. तुम्ही जे करता त्यात तुम्ही जसे अधिक प्रवीण व्हाल, तेवढी तुमची उत्पन्न मिळवण्याची क्षमता वाढते - चक्रवाढ व्याजाप्रमाणे.
दुर्दैवाने, तळातले ८० टक्के लोक, जे बहुसंख्य असतात ते कौशल्यं वरच्या पातळीवर नेण्याचा फार अल्प किंवा शून्य प्रयत्न करतात. जॉफ्रे कोल्विनच्या २००९ च्या
‘
टॅलंट इज ओव्हररेटे’
पुस्तकानुसार, बहुसंख्य लोक त्यांच्या नोकरीच्या पहिल्या वर्षांत त्यांची कामं शिकतात, आणि मग ते त्यापेक्षा चांगले कधीच होत नाहीत. सातत्याने सुधारणा करण्याची बांधीलकी फक्त वरच्या थरातील लोकच मानतात.
ज्ञान, कौशल्य आणि कठोर परिश्रम ह्यांच्यावर आधारित उत्पादनक्षमतेच्या वाढत्या असमतोलांमुळे, आजच्या अमेरिकेत शिखरावरचे १ टक्का लोक ३३ टक्के आर्थिक मालमत्ता नियंत्रित करतात.
क्रमशः...
0 टिप्पण्या