यशाचा ८०/२० फॉर्मुला.
जीवनाच्या प्रवासात तुम्ही स्वत:ला विचारत असलेले सर्वात महत्त्वाचे प्रश्न हे आहेत: ‘मी इथे का आलो?’ ‘मला माझ्या आयुष्यात नक्की काय हवंय?’ ‘मी कुठे चाललो आहे?’ ‘माझ्या सर्व आकांक्षा आणि ध्येयं जर मी पूर्ण केली, तर माझं आयुष्य कसं असेल?’
ऐशी/वीस नियम असं सांगतो की तुम्ही करत असलेल्या वीस टक्के कामांमधून तुमच्या आयुष्यातल्या कृतींचं ऐशी टक्के मूल्य दिसतं. याखेरीज ‘वीस/ ऐशी नियम’ही तुमच्या आयुष्याला लागू पडतो. हा नियम असं सांगतो की, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे हे ठरवताना, विचारात आणि नियोजनात सुरुवातीचा जो वेळ तुम्ही खर्च करता, त्यातला पहिला वीस टक्के वेळ खूप महत्त्वाचा असतो. कारण, भविष्यात तुम्ही जे काही मिळवणार आहात त्याच्या परिणामांच्या आणि मूल्याच्या ऐशी टक्क्याहून अधिक भाग तो वेळ ठरवतो.
यशस्वी आणि सुखी माणसं आपण स्वत: कोण आहोत आणि आपल्याला काय हवंय हे शोधण्यात बराच काळ व्यतीत करताना दिसतात. आपल्याला काय हवंय आणि आपली उद्दिष्टं काय आहेत, हे विचारात घेऊन आपण काय मिळवलंय याचा ते एकसारखा मागोवा घेतात. पाहिजे त्याच इमारतीला रेलून उभ्या असलेल्या शिडीवर आपण चढतो आहोत की नाही, याची ते शिडीवरून चढताना खातरजमा करून घेतात.
तुमच्या व्यक्तिगत मोठेपणाची सुरुवात म्हणजे तुम्ही एकमेवाद्वितीय आहात याची तुम्हाला जाणीव होणं. संपूर्ण विश्वात तुमच्यासारखी अन्य कोणतीही व्यक्ती होऊन गेलेली नाही. तुमच्यापाशी असलेल्या उत्तम क्षमता, कौशल्यं, अंगभूत आवडी, अंतर्दृष्टी आणि कल्पना यांत तुमचं वेगळेपण आहे. एका अर्थानं, आजपर्यत जन्माला येऊन गेलेल्या सगळ्या लोकांहून तुम्ही सरस आहात. यापूर्वी तुम्ही मिळवलेल्या कोणत्याही यशापेक्षा मोठं यश मिळवण्याची तुमच्यामधे एक अंगभूत क्षमता आहे. तुमची रचना आणि जडणघडण एखाद्या ‘जथिष्णू जीवा’प्रमाणे आहे. ज्या गोष्टी तुम्हाला अधिकाधिक यश आणि हवा असणारा आनंद देतात त्या अधिकाधिक प्रमाणात करण्याची तुमची सहज प्रेरणा आहे.
बरेच लोक त्यांच्या अंगी असलेल्या क्षमतांपेक्षा खूप कमी प्रतीचं काम करतात आणि न ‘वापरात आलेल्या क्षमता स्वत:मधे बाळगूनच’ जगाचा निरोप घेतात, ही फार मोठी शोकांतिका आहे. कशाच्या तरी दाबाखाली घटनांना प्रतिसाद द्यायचा म्हणून ते काम करतात. आईवडिल, वरिष्ठ अधिकारी, जबाबदाऱ्या, देणी यांना प्रतिसाद देत बिनतक्रार जगायची त्यांना आपोआप सवय होऊन जाते. हे करताना आपल्याला काय हवंय याविषयी घटकाभर शांत बसून विचार करावा असं त्यांच्या मनातही येत नाही.
आपल्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या लोकांची एक खासियत असते, ‘ते कोण आहेत हे त्यांना माहीत असतं’. कोणत्या तत्त्वांवर आपली श्रद्धा आहे हे ठरविण्यासाठी, या व्यक्तींनी, विचार करायला पुरेसा वेळ दिलेला असतो. ते कुठे चालले आहेत आणि जिथे त्यांना पोचायचं आहे तिथे ते कसे जाणार आहेत, हे त्यांना माहीत असतं.
यातला आनंदाचा भाग असा की, नेते काही नेते म्हणून जन्माला आलेले नसतात, त्यांना घडवलं गेलेलं असतं. नेते जसा विचार करतात तसा विचार करून आणि ते जसे वागतात तसे वागून तुम्हीही नेता बनता. म्हणजेच, नेतृत्व हे पद नाही, ती कृती आहे. नेतृत्व ही काही ओळखपत्रावर मिरवायची उपाधी नाही. दररोज तुम्ही जे करता आणि बोलता त्यानं नेतृत्व ठरत असतं. जेव्हा तुम्ही नेत्यासारखा विचार करू लागता, चालूबोलू लागता तेव्हा तुम्ही नेता बनता. तुम्ही तुमचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ तुमच्या स्वत:च्या हातात घेता. स्वत:च्या नियतीवर प्रभुत्व मिळवून तुम्ही तुमचे भाग्यविधाता बनता.
तुमच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण बनून दाखवण्यासाठी तुम्हाला या जगात पाठवलं गेलं आहे. तो सुंदर घाट म्हणजे काय हे शोधणं आणि जीव ओतून त्यासाठी काम करणं ही तुमची जबाबदारी आहे. मदर टेरेसाप्रमाणे, तुमच्यासमोरही कुठलं तरी एकमेव उद्दिष्ट असू शकतं. तुमच्या आयुष्यात एकाहून जास्त उद्दिष्टंही असू शकतात. जसजसा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत जातो, तसतशी तुमची उद्दिष्टं क्रमाक्रमानं बदलत जाऊ शकतात.
विचारामधे नि:संदिग्धता असणं हा सर्व यशस्वी लोकांमधे हमखास आढळणारा गुण आहे. त्यांची कशावर श्रद्धा आहे, कोणत्या बाबतीत ते ठाम राहणार, ते कुठे वाटचाल करत आहेत, या बाबतीतले त्यांचे विचार अगदी स्पष्ट असतात. तुम्ही तशी नि:संदिग्धता मिळवायला हवी.
‘तुमची मनापासूनची इच्छा कोणती?’ ज्या कारणासाठी तुम्हाला या पृथ्वीतलावर पाठवलं गेलं, तो हेतू म्हणजे हृदयापासूनची इच्छा. तुम्ही आणि फक्त तुम्हीच, जी महत्त्वाची निराळी गोष्ट उत्कृष्टपणे करू शकता, ती म्हणजे तुमच्या हृदयाची इच्छा. तुम्ही करणार असलेली महत्त्वाची निराळी गोष्ट कोणती, याचा जन्मभर शोध घेणं हे तुमचं जीवितकार्य असलं पाहिजे. ते केलं तरच तुम्ही खरोखर सुखी, समाधानी आणि पूर्णतया यशस्वी व्हाल. तुमचं जीवितकार्य काय आहे?
स्वप्न पाहण्याची मुभा स्वत:ला द्या आणि मोठाली स्वप्नं पहा. सराव (एक्सरसाइज) म्हणून अशी क्षणभर कल्पना करा, की तुम्हाला काहीही अशक्य नाही. जगातलं जे काही तुम्हाला हवंय, ते तुमच्याजवळ आहेच. तुम्हाला जे कोणी बनायचं आहे ते तुम्ही बनू शकता आणि जे तुम्हाला करायचं आहे ते करू शकता.
तुम्हाला हवा आहे तेवढा वेळ आणि पैसा तुमच्यापाशी आहे अशी कल्पना करा. कुठल्याही बाबतीत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व शिक्षण आणि अनुभव तुमच्यापाशी आहे अशी कल्पना करा. तुमच्यासाठी आवश्यक ते दार उघडू शकतील आणि तुमची कुठेही शिफारस करू शकतील असे मित्र आणि परिचित लोक तुमच्यापाशी आहेत. कुठल्याही शक्यतांचा लाभ उठवण्यासाठी गरजेच्या असलेल्या सर्व संधी आणि साधनसामुग्री तुमच्याजवळ आहे. तुमच्या मनात आलेल्या कोणत्याही उद्दिष्टाप्रत जाण्यासाठी जरुर असलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत. तुमच्यावर कसलीच मर्यादा नाही अशी कल्पना करा.
तुम्ही काय बनू शकाल, काय करू शकाल, तुमच्यापाशी काय असू शकेल या कशालाच जर मर्यादा नसतील तर, तुम्ही स्वत: समोर कोणती उद्दिष्टं ठेवाल? कुठल्याही छोट्या-मोठ्या, अल्पकालीन–दीर्घकालीन गोष्टीत तुम्हाला निश्चित यश मिळेल अशी जर तुम्हाला हमी मिळाली तर, तुम्ही स्वत:साठी कोणतं अत्युच्च ध्येय निवडाल? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि स्वभावधर्माविषयी जास्त खात्रीलायक माहिती देईल.
सगळ्या व्यक्तिमत्त्व चाचण्यासुद्धा एवढी विश्वसनीय माहिती देऊ शकणार नाहीत.
खेदाची गोष्ट अशी की, बरेच लोक दैनंदिन जीवनाच्या कोत्या आणि जाचक बंधनामध्ये स्वत:च स्वत:ला जखडतात. क्वचित कधीतरी आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत असताना, ‘आपल्याला खरोखर काय करावंसं वाटतंय’ असा पुसट विचार सर्वसामान्य व्यक्तींच्यामनाला शिवून जातो. पण ‘आपल्याला ते कसं करता येणार नाही’ याबद्दलचे विचार दुसऱ्याच क्षणी त्यांच्या मनात घोळायला लागतात. आपणच आपल्या बेतांवर पाणी फिरवत असतो. बरेचदा आपल्या स्वप्नं पाहणाऱ्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्याही आशाआकांक्षांवर, स्वप्नांवर, बेतांवर आपण असेच पाणी फिरवतो.
तुमच्या विचारशक्तीला बंधमुक्त करण्यासाठी या पुढच्या प्रश्नांना उत्तरं द्या. ती उत्तरं तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतील. तुम्ही आत्तापर्यंत कधी मनातही आणल्या नसतील, अशा अनेक शक्यता तुमच्यापुढे खुल्या होतील.
हा पहिला प्रश्न : ‘समजा एखाद्या स्पर्धेमधे तुम्हाला करमुक्त दहा लाख रोख मिळाले तर, तुम्ही तुमच्या आयुष्यात कायकाय बदल कराल?’
अशी कल्पना करा की तुम्हाला एका फोन आलाय. तुम्हाला दहा लाख डॉलर्सचं रोख बक्षीस मिळालं आहे असं त्या फोनवर सांगण्यात आलंय. पण ते बक्षीस मिळवण्यासाठी एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगोदर द्यावं लागेल. एवढे पैसे मिळाल्यावर तुम्ही तुमचं आयुष्य कसं बदलाल ते नेमक्या शब्दांत सांगितल्यावरच ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. अशा परिस्थितीत या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल?
हा प्रश्न तुम्हाला मुक्त करू शकणार आहे. तो तुम्हाला जोखडातून बाहेर काढेल. दैनंदिन खर्च, देणी यातच गुंतून पडल्यामुळे स्वप्नं पाहण्याची सूट बरेच लोक स्वत:ला देत नाहीत. तुम्हाला दहा लाख डॉलर्स मिळाले आहेत हे समजल्यावर तुम्हाला निवडीचा केवढा मोठा मोका मिळाला आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला जे कोणी बनायची इच्छा आहे ते बनण्याच्या, इच्छित गोष्टीमिळवण्याच्या आणि करण्याच्या संधी तुमच्यापुढे आता हात जोडून उभ्या आहेत.
असा प्रश्न एखाद्याला विचारला तर, ताबडतोब सध्याची नोकरी सोडून काहीतरी वेगळंच करायचा विचार पहिला त्याच्या मनात येतो. सध्याच्या नोकरीबाबत आपण समाधानी आहोत, असं म्हणणारे लोकही याला अपवाद नाहीत. अकस्मात इतकं घबाड मिळालं तर त्यांच्याही मनात आहे ती नोकरी सोडण्याचा विचार प्रथम येईल.
यातून एक नियम लक्षात येतो : मोठी रक्कम मिळाल्यावर तत्काळ नोकरी सोडण्याचा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर, सध्याची नोकरी तुमच्यासाठी योग्य नाही. बहुधा, तुम्हाला अगदी योगायोगानं सध्याची ही नोकरी मिळाली असेल. तुम्हाला काहीतरी काम आणि त्या अनुषंगाने येणारा पैसा हवा आहे म्हणून एकदा मिळालेली ही नोकरी तुम्ही करत राहिलात. जे लोक स्वत:साठी योग्य असलेली नोकरी करत असतात, ते लोक अचानक पैसा मिळाल्यावर ती नोकरी सोडण्याचा विचार कदापि करत नाहीत. त्यांना त्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल करावासा किंवा सुधारणा कराविशी वाटेल. कदाचित दुसऱ्या गावी किंवा दुसऱ्या कंपनीत काम करायचा ते विचार करतील. पण ते त्यांची नोकरी सोडणार नाहीत.
जर दहा लाख डॉलर्स मिळाल्यावर तुम्ही तुमची नोकरी सोडून दुसरं काही करायचा विचार करत असलात, तर त्या नोकरी ऐवजी इतर काय तुम्हाला करावंसं वाटेल? जर तुम्हाला दुसरी नोकरी करायची असेल, तर कोणती नोकरी तुम्ही निवडाल?
एखाद्या क्षेत्रात जाण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्यं आणि अनुभव तुमच्या गाठी नाहीत हे घटकाभर तुम्ही विसरा. यातल्या कुठल्याच मर्यादा तुम्हाला पडणारनसतील तर, तुम्हाला काय करायला सर्वात जास्त आवडेल याचाच फक्त क्षणभर विचार करा.
जे काम करण्यात तुम्हाला आनंद मिळतो, ते केलंत तर नेहमी तुम्हाला चांगला पगारही मिळेल आणि तुम्ही सुखीही राहाल. तुम्ही जे काम करत आहात ते समजून घेऊन करा, त्या कामावर विश्वास ठेवा आणि ते आवडीनं करा, हे नोकरीतल्या यशाचं त्रिपदरी गमक आहे.
0 टिप्पण्या