भारतातील अद्भुत नाडीग्रंथ
तो काळ कृतयुगाचा होता. सृष्टी रचनेस नुकताच प्रारंभ झाला होता. स्वयं परमेश्वर अनेक रूपांनी प्रकट झाला होता. 'एकोऽहम् बहुस्याम्' (मी एक आहे अनेक व्हावे) या संकल्पाबरोबरच सृष्टी रचनेस प्रारंभ झाला. सूर्य-चंद्र-ग्रह नक्षत्र-तारे यांची रचना झाली. नंतर ईश्वरी संकल्पानुसार अनेक ऋषी निर्माण झाले.
स्वयंभू, अयोनीसंभव, त्रिकालज्ञ ऋषींनी भावी जग कसे असेल हे जाणून असंख्य ग्रंथांची रचना केली. यात नाडीग्रंथ प्रमुख आहेत. नाडीग्रंथांमध्ये प्रत्येक व्यक्तीचे भविष्य तंतोतंत वर्तविलेले असते. हजारो वर्षांपूर्वी ऋषींनी भावी काळात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवलेले आहे. त्याची अचूकता पाहून आश्चर्य वाटते. इतकेच नव्हे तर त्या ऋषींना भविष्यकथन करताना ज्या व्यक्तीचे भविष्य कथन करीत आहेत, ती व्यक्ती केव्हा आपले भविष्य जाणून घेण्यास येईल याचेही ज्ञान होते. त्यामुळे काही ठिकाणी वर्तमानकाळात भविष्य वर्णन केलेले आहे. तर काही ठिकाणी अर्धवट भविष्य सांगून या पुढील भविष्य अमुक वर्षांनी वाचावे, असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत.
उत्तर हिंदुस्थानात या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. तर दक्षिण हिंदुस्थानात या ग्रंथांना नाडीग्रंथ असे म्हणतात. नाडीग्रंथ एकूण किती आहेत, हे समजायला मार्ग नाही, तरी पण जी नावे ऐकण्यास मिळतात त्याप्रमाणे एकूण सतरा-अठरा तरी नाडी ग्रंथ असावेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
१) ईश्वरनाडी २) वशिष्ठ नाडी ३) शुकनाडी ४) बुधनाडी ५ ) ध्रुवनाडी ६) शुक्रनाडी ७) भृगुनाडी ८) सूर्यनाडी ९ ) नंदीनाडी १०) काकनाडी ११) नारदनाडी १२) अगस्त्यनाडी १३ ) कौशिकनाडी १४) चंद्रनाडी १५) अरुणनाडी १६) सत्यनाडी १७) भीमनाडी १८ ) अत्रिनाडी
ईश्वरनाडी, वशिष्ठनाडी, अगस्त्यनाडी हे ग्रंथ तामिळनाडू राज्यातील येथे असून, काकनाडी किंवा काकाभुजंदर नाडी हा ग्रंथ पूर्वी तंजावूर मयूरम येथे होता. तेथून तो ग्रंथ कुंभकोणम येथे हलविण्यात आला. सुमारे १०० वर्षांपूर्वी कुंभकोणम येथे काकनाडी किंवा काकाभुजंदरनाडी हा ग्रंथ होता; परंतु सध्या मात्र तो तेथे नाही. या ग्रंथाविषयी खूप ठिकाणी चौकशी करूनही या ग्रंथाचा ठाव ठिकाणाच मिळत नाही. तर बुधनाडी बंगलोर येथे आहे असे म्हणतात. दिल्ली व मेरठ येथेही नाडीग्रंथ असल्याची माहिती मिळते.
ईश्वरनाडी
तंजावूर जिल्ह्यातील कुंभकोणम व मायावरम या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपासून सुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर वैद्येश्वरन कोईल या गावी ईश्वरनाडी नावाचा ग्रंथ आहे.
नाडीग्रंथ वाचणारा पंडित प्रथम अंगठ्याचा ठसा घेतो. या ठश्यावरून तुमच्या भविष्याचे पान शोधून काढतो. तद्नंतर तो तुम्हाला तुमचे नाव, तो तुमच्या आई-वडिलांचे नाव, तुम्हाला किती भाऊ-बहिणी आहेत, इत्यादी सर्व माहिती सांगतो. ही सर्व माहिती बरोबर आल्यानंतर पुढील भविष्य वाचण्यास सुरुवात करतो व मृत्यूपर्यंत सर्व भविष्य अचूक सांगितले जाते. या मध्ये तुम्हाला किती मुलगे व किती मुली होणार हे अचूक सांगितले जाते.
एखाद्या व्यक्तीला दुःख व क्लेश असतील तर पूर्वजन्मीच्या कुठल्या पाप कर्मामुळे हे दुःख व क्लेश भोगावे लागत आहेत व त्यावर उपाय काय, हेही सांगितले जाते.
• काकनाडी किंवा काकाभुजंदरनाडी •
या ग्रंथात इतर नाडीग्रंथांप्रमाणे असंख्य मानवांची व्यक्तीगत भविष्ये असून, विशेष म्हणजे काकाभुजंदर ऋषींनी या ग्रंथात जागतिक भविष्येही लिहिलेली आहेत. खूप प्रयत्न करूनही मद्रास, तंजावूर काकीनाडा, कुंभकोणम येथे या ग्रंथाचा शोध लागू शकला नाही. परंतु त्या भागातील लोक जे सांगतात त्याचा सारांश पुढील प्रमाणे
१८०० नंतर जगामध्ये प्रचंड वेगाने वैज्ञानिक प्रगती होऊन इ. स. २००० सालापर्यंत मानवाने प्रगतीची परिसीमा गाठलेली असेल. परंतु या वैज्ञानिक प्रगतीबरोबर मानव धर्म विसरेल व ऐहिकतेलाच सर्वस्व मानू लागेल. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी तो शंका धरू लागेल. मानवता विसरून जाईल. मानव महत्त्वाकांक्षी व भयंकर अहंकारी बनेल. यामुळे सृष्टीवर शासन करणाऱ्या असंख्य देवी-देवतांचे कोप होऊन पृथ्वीवर प्रलयंकारी स्थिती निर्माण होईल. १९९८ ते २०२० या काळात प्रचंड क्रांती होऊन प्रचंड नरसंहार होईल. १९८६ ते २०२६ या काळात ठिकठिकाणी भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी उद्रेक व चक्रीवादळे होऊन प्रथम ईश्वरीकोपाच्या सूचना मानवास मिळतील. याने मानव शहाणा न झाल्यास १९९६ ते २०२० या काळात प्रचंड नरसंहार होऊन पृथ्वीवरील अंदाजे ८० टक्के जनसंख्या नष्ट होईल. २०२० पासून नवीन मन्वंतर सुरू होईल. या नवयुगातील मानव धार्मिक, सज्जन व मानवतावादी असेल.
आगामी काळात घडणाऱ्या या महाक्रांतीमध्ये पृथ्वीवरील अनेक देश नकाशावरून पुसले जातील, तर काही युद्धांमध्ये बेचिराख होतील. हिमालय पर्वतावरील बर्फ वितळून त्याचे पाणी विंध्यपर्वतापर्यंत येईल, असेही या ग्रंथात लिहिले असल्याचे सांगतात. काकभृशुंडी किंवा काकाभुजंदर यांनी लिहिलेल्या भविष्याप्रमाणे इतर काही योग्यांनीही जागतिक भविष्ये लिहिलेली आहेत. तीही जवळ जवळ एकसारखीच आहेत. अनेक योग्यांशी जागतिक भविष्याविषयी चर्चा केली असता १९९५ ते २०२० पर्यंतचा काळ क्रांतिकारक असल्याचे सर्वजण सांगतात.
या काकनाडी ग्रंथात असेही लिहिलेले आहे, की आगामी काळात चंद्र पूर्णरूपेण प्रकाशित राहील. म्हणजे अमावास्या होणार नाही. चंद्राच्या कला असणार नाहीत. तसेच पृथ्वीवरील महिना १६ दिवसांचा असेल, असेही म्हटलेले आहे. परंतु या घटनांचा कालखंड निश्चित असा कोणी सांगत नाही.
भारतीय गूढविद्या या स्वामी दत्तावधूत लिखित पुस्तकातून साभार.....
0 टिप्पण्या