श्रावण मास 2021
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे |
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ||
:- बालकवी
सर्वप्रथम सर्व वाचकांना आणि भाविकांना परम पवित्र अशा श्रावण मासाच्या आरंभा प्रित्यर्थ शुभेच्छा ...!
श्रावण मास हा चातुर्मासातील सर्वात पहिला आणि महत्वाचा महिना ..हा महिना भगवान शिवाला अत्यन्त प्रिय आहे कारण याच मासात माता पार्वतीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपाचरण केले होते. माता पार्वतीच्या ह्या तपाला आपले प्रेम मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाचे प्रतीक मानले जाते.
सृष्टीतील नवचैतन्याची देखील जणू हि पहाटच असते कारण वातावरणातील उकाडा जाऊन सारे वातावरण हे आल्हाददायक झालेले असते. या महिन्यापासून वर्षा ऋतू प्रारंभ होतो तसेच प्रकृती वातावरण आणि मनुष्याच्या शरीरात देखील बदल होतात ; शरीराप्रमाणे मनोभूमीत आणि विचारतरंगात सुद्धा अनेक महत्वाचे बदल घडून येतात. म्हणून आपल्या आध्यत्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून या महिन्यात व्रत उपवास आणि तप यांचे अत्याधिक महत्व सांगितले आहे.
श्रावण नाव कसे पडले ?:- ज्योतिष विज्ञानानुसार या महिन्यात आकाशात श्रवण नक्षत्राचा योग बनतो म्हणून या नक्षत्रावरून त्याचे नाव श्रावण असे ठेवण्यात आले...!
समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिव हलाहल विष पिऊन मूर्च्छित झाले त्यावेळी परमशिवभक्त रावणाने गंगाजल एका कावडीत भरून त्याने शिवाभिषेक केला त्यामुळे शिव भगवंताचा त्रास कमी झाला व त्यांनी प्रसन्न होऊन रावणास आशीर्वाद दिला. म्हणून भगवान शिवाला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक त्याचप्रमाणे बेलपत्र अत्यन्त प्रिय आहे असे मानले जाते . दरवर्षी हजारो , लाखो श्रद्धाळू भाविक गंगाजलाची कावड घेऊन जाऊन ज्योतिर्लिंगावर अभिषेक करतात.
भगवान महादेवाला शीघ्र प्रसन्न होणारी देवता मानली जाते, इतर देव भक्ताची पात्रता पाहून आणि परीक्षा देऊन भक्ताला फळ आणि आशीर्वाद देतात ; परंतु आपले महादेव भोळे सांब सदाशिव आहेत , ते आपल्या भक्तांमध्ये कधीच भेदभाव करीत नाहीत, आणि हेच कारण आहे कि , सर्व देवता अर्धंदेवता नागदेवता राक्षस यक्ष मनुष्य किंकर त्यांचे भक्त आहेत आणि त्यांच्या एका कृपा कटाक्षासाठी धडपडत असतात ...!
शिव हेच नित्य नूतन परिवर्तन आहे आशुतोष शिवाप्रमाणे आपण नैराश्य , दुर्गुण , दुर्विचारांचे विष पिऊन सद्गुणांची कास धरली पाहिजे तरच आपण महादेवाची कृपापात्र बनू शकू...!
‖ॐ नमः शिवाय ‖
0 टिप्पण्या