या तालिबान च करायचं काय..?



                       एकीकडे आपला देश हिरक महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या अगोदर स्वातंत्र्य मिळालेला अफगाणिस्तान  मात्र धर्मांध तालिबानच्या अत्याचार व क्रूर कृत्याने होरपळून निघत आहे. पण या तालिबानी संघटनेची सुरुवात झाली  तरी कशी आणि असे काय नेमके झाले की आज ते आपल्याच बांधवावर एवढा अन्याय करत आहे..? अमेरिका आणि रशिया सारख्या महासत्तानी नांग्या टाकाव्या एवढा दरारा  आज तालिबान ने निर्माण केला आहे. 



   पश्तून भाषेत तालिबान या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी .  मुळात तालिबानी म्हणजे कोण तर सौदी अरेबिया च्या आर्थिक साहाय्याने चालणाऱ्या मदरस्यातील विद्यार्थी..! परंतु या मदरस्यातुन कट्टर सुन्नी पंथाचे शिक्षण दिले जात असे म्हणतात.

    दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व राष्ट्रांना हे कळून चुकले होते की शहाणपणा हा युद्ध करण्यात नक्कीच नाही; परंतु अमेरिका आणि सोव्हिएत रशिया आपापले वर्चस्व कमी होऊ देण्यास तयार नव्हते आणि झोपलेल्या ड्रॅगन चीनचा उदय तेव्हा झालेला नव्हता.  पूर्ण जग या २ राष्ट्रांच्या गटाने विभागले असताना या राष्ट्रांनी अस्थिर सरकारे असलेल्या देशात हस्तक्षेप सुरू केला. या काळात सीआयए आणि केजीबी सारख्या संस्था एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला मारणे ,   त्याला निवडणुकीत हरवणे अश्या कार्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होते.

  अश्याच काळात १९७९ साली जेव्हा अफगाण सरकार अस्थिर होते त्यावेळेस रशियाने आपले सैन्य सरकारच्या मदतीस पाठवले होते आणि त्याचवेळेस तालिबान सक्रिय झाली. अफगाणिस्तान आणि रशिया मध्ये सैन्य सुरक्षा संबंधित जो करार झाला होता त्यानुसार रशियाला अफगाण सरकारला  मदत करणे भाग होते , परंतु रशिया या मदतीच्या आड स्वतःचा फायदा बघत होती. अफगाणिस्तान चा भूभाग हा खनिज संपत्तीने समृद्ध असा आहे तसेच त्याठिकाणी सुकामेवा आणि केशर यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते . रशियाने या सर्व व्यापारावर नियंत्रण मिळवले होते. काही अंशी हे योग्य होते जर एखादा देश आपले सैन्य  मदतीला पाठवत असेल तर त्याला सांभाळण्याचा खर्च नेमका कोणी करावा हा एक प्रश्न आहे.  हळूहळू महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या डोळ्यात या गोष्टी खुपू लागल्या. त्यामुळे रशिया चे महत्व कमी करण्यासाठी त्यांनी खटाटोप सुरू केली.

    अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशा कडे स्वतःचा प्रचंड असा भूभाग आहे तसेच नैसर्गिक साधन संपत्ती सुद्धा भरपूर  आहे तरीसुद्धा त्यांची नजर ही नेहमी दुसऱ्या  राष्ट्रांकडे असते.  एव्हाना अफगाणी जनतेला हे कळून चुकले होते की आपल्या जमिनी वर हक्क सांगणारे हे लोक आपली फसवणूक करत आहेत त्यातच अमेरिकेने या संधीचा फायदा करून घेण्यासाठी हस्तक्षेप करून तालिबान संघटनेला गुप्तरीत्या चिथावणी दिली. त्यासाठी लागणारे सर्व शस्त्र सुद्धा पुरवण्यात आले. शस्त्र बनवण्याचे हजारो कारखाने असलेल्या अमेरिकेला ही गोष्ट कठीण वाटली नाही. परंतु यानंतर सुरू झाला तो तालिबान चा रक्तरंजित प्रवास ...!

   अशिक्षित आणि मूर्ख तालिबानच्या हातात शस्त्रे पडल्यावर त्यांनी रशियन सैनिकविरुद्ध उघड युद्ध घोषणा केली. या तालिबानी अतिरेक्यांकडे शस्त्रे चालवण्याचे आणि युद्धाचे कोणतेही प्रशिक्षण नव्हते पण त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती त्यामुळे त्यांनी गुरिल्ला युद्धनीतीचा वापर करून रशियन सैन्याला जेरीस आणले . आपल्या सैन्याची होणारी वाताहत बघुन तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष यांनी आपल्या सैन्यास घरवापसीचा आदेश दिला.  त्यानुसार १९९८ साली रशिया चे सैन्य मायदेशी परतले. ह्या प्रकारानंतर रान मोकळे झालेल्या तालिबाण ने त्याचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली. सर्वप्रथम सत्तेत आल्यावर त्यांनी शरिया कायदा लागू करण्याची घोषणा केली. मग त्या कायद्याच्या आड सामान्य जनतेचा क्रूर छळ केला गेला. गुन्हा सिद्ध होण्या अगोदरच तालिबानी अतिरेकीकडून शिक्षा होऊ लागली. यात चोरी केली म्हणून हात कापणे. हिजाब किंवा बुरखा घातला नाही म्हणून स्त्रियांना दगडाने ठेचून मारणे असो किंवा सार्वजनिक रित्या फासावर लटकवणे सर्व शिक्षा अत्यन्त क्रूर आणि अमानुष होत्या. आतासारखीच तेव्हा देखील जनता त्राहीमम करत होती त्याचवेळेस अमेरिकेने मोठ्या भावाची भूमिका घेत आपले नाटो सैन्य २००४ साली अफगाणिस्तानात पाठवले ...! मुख्य हेतू होता शांती प्रस्थापित करण्याचा.  पुर्णपणे नाही पण बहुतांशी भागात अमेरिकेच्या या हेतूला यश मिळाले . परंतु तालिबान मागे हटायला तयार नव्हताच. 

  पेंटागोन या अमेरिकन सुरक्षा संस्थेच्या अहवालानुसार आजपर्यंत अमेरिकेने या मोहिमेवर ६५ ट्रीलियन डॉलर खर्च झाला आहे तसेच हजारो अमेरिकी नागरिक व सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत..! या गोष्टीकडे लक्ष देऊन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षीच आपली सेना अफगाणिस्तानातून परत बोलवण्याचे ठरवले त्यांनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान झालेल्या जो बायडेन यांनी हा निर्णय मागे न फिरवता त्याला मंजुरी दिली.  त्यानुसार अमेरिकेन सैन्याने टप्प्या टप्याने पीछेहाट घेतली यामागे बायडेन यांचा तर्क हाच होता की आम्ही अफगाण सैन्याला पूर्णतः प्रशिक्षित केलेले आहे आणि आता आमच्या सैन्याला होणारे नुकसान आम्हाला कमी करायचे आहे. परंतु ज्या वेगाने अमेरिकन सैन्याने माघार घेतली व त्यांनतर तालिबान ने ज्या वेगाने सत्ता काबीज केली त्यावरून हे सगळे अगोदरच ठरलेल होते अशी शंका व्यक्त होत आहे. असेही सांगितले जाते की अफगाण सेना पूर्णपणे प्रशिक्षित होती व तालिबान विरुद्ध लढा देऊ शकली असती परंतु अफगाणी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांची कमकुवत राजकीय इच्छाशक्ती याला कारणीभूत ठरली. म्हणूनच त्यांनी सैन्याचा नेतृत्व न करता विदेशात पळून जाणे पसंत केले...!

याबद्दल स्पष्टीकरण देताना गनी म्हणाले की , "जर आमच्याच बांधवाना आम्हाला मारायचे असेल तर माझ्याकडून ते होणार नाही . सत्तेत आम्ही राहिले काय किंवा ते राहिले काय ? कमीतकमी आम्ही आपापसात लढून तर मरणार नाही."

त्यांच्या या वक्तव्याची पूर्ण जगभरात खिल्ली उडवली जात आहे. आपल्या देशाला दुःखात  लोटून पळून गेल्याबद्दल त्यांची निर्भत्सना होत आहे ..!

 विमानावर लटकून जाण्याइतपत जीवावर उदार होऊन जनता प्रवास करत असेल तर तालिबान ची दहशत काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी ...! पुढे तालिबान काय करतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे

आता या सगळ्या प्रकारात कोण योग्य कोण अयोग्य ते सुजाण वाचकांनीच ठरवावे ..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या