विपत्तीमध्ये काय करावे :-
आपदर्थे धनं रक्षेद् दारान् धनैरपि।
आत्मानं सततं रक्षेद् दारैरपि धनैरिप ।। 6 ।।
विपत्तीच्या काळासाठी संपत्ती रक्षण केले पाहिजे. संपत्तीपेक्षा जास्त रक्षण पत्नीचे केले पाहिजे. पण आपल्या रक्षणाचा प्रश्न उभा राहिला तर धन व पत्नीचे बलिदान करावे लागले तरी करावे.
संकटात, दुःखात संपत्तीच मनुष्याच्या उपयोगी पडते. अशा संकट समयी साठविलेली संपत्तीच कामी येते म्हणून मनुष्याने धनाचे रक्षण केले पाहिजे. पत्नी संपत्तीपेक्षा जवळची असते म्हणून तीचे रक्षण संपत्तीच्या अगोदर करावे. पण संपत्ती आणि पत्नीच्या आधी तसेच दोन्ही पेक्षा जास्त स्वतःचे रक्षण केले पाहिजे. स्वतःचे रक्षण केल्यावर सर्वांचेच रक्षण करता येते.
आचार्य चाणक्य संपत्तीचे महत्व कमी लेखीत नाहीत कारण संपत्तीमुळे मुनष्याची अनेक कामं होतात पण कुटुंबातील भद्र महिला, स्त्री अथवा पत्नीच्या जीवन सन्मानाचा प्रश्न समोर आला तर संपत्तीची चर्चा करू नये. कुटुंबाच्या मान मर्यादेमुळेच व्यक्तीची आपली मान-मर्यादा असते. तीच नसेल तर जीवन काय कामाचे आणि संपत्ती काय कामाची? पण जेव्हा व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनावर बेतले तर धन, स्त्री सर्वांची काळजी त्यागून व्यक्तीने आपल्या जीवनाचे रक्षण केले पाहिजे. व्यक्ती राहिली तरच पत्नी व धनाचा उपभोग घेऊ शकतो नाहीतर सगळेच व्यर्थ आहे. राजपूत स्त्रियांनी जेव्हा पाहिले की राज्याचे रक्षण करणे वा ते वाचविणे अशक्य आहे तेव्हा त्यांनी जोहार व्रताचे पाळन केले आणि आपल्या प्राणांची आहूती दिली. हाच जीवनाचा धर्म आहे.
आपदर्थे धन रक्षेच्छ्रीमतांकुतः किमापदः।
कदाचिच्चलिता लक्ष्मी संचिताऽपि विनश्यति ।। 7।।
आपत्ती काळासाठी संपत्तीचे रक्षण केले पाहिजे पण श्रीमंताला कशाची आपत्ती, म्हणजेच श्रीमंतावर आपत्ती येतेच कुठे? प्रश्न उभा राहतो की लक्ष्मी चंचल आहे. तर केव्हा नाहीशी होईल आणि जर असे असेल तर जमा केलेली संपत्ती सुद्धा नाहीशी होऊ शकते.
वाईट वेळ आल्यावर व्यक्तीचे सर्वच नष्ट होते. लक्ष्मी स्वाभावानेच चंचल असते. तिची कांहीच खात्री नाही की केव्हा सोडून जाईल. त्यामुळे श्रीमंतानीही असे समजू नये की त्याच्यांवर संकट येणार नाही. वाईट वेळेसाठी संपत्तीचा कांही भाग सुरक्षित ठेवला पाहिजे.
वस्तुतः हा श्लोक ‘भोज प्रंबंधात’सुद्धा आहे. राजा भोज व कोषाध्यक्षाच्या संवादाचा प्रसंग आहे. राजा भोज अतिशय दानशूर होता. त्याचा दानधर्म पाहून कोषाध्यक्ष एक श्लोक सांगतो तर राजा उत्तरादाखल श्लोक सांगतो. शेवटी कोषाध्यक्ष राजाचे मत व दानाचे महत्व ओळखून आपली चूक कबूल करतो.
येथे असे मत आहे की धन अयोग्य कामात खर्च केले तर ते नष्ट झाल्यावर मनुष्याला विपन्नावस्था येते पण ते सत्कार्यासाठी खर्च केले तर ते व्यक्तीचा मान-प्रतिष्ठा आणि समाजात आदरणीय होतो कारण संपत्ती अशाश्वत असते. तीचा काय गर्व करावा? व्यक्ती ते कमावते पण वास्तविक शक्ती ईश्वर देणगी आहे व शाश्वत आहे. जोपर्यंत त्याची कृपा आहे तोपर्यंत सगळच आहे पण हेही निश्चित आहे कि संपत्ती मनुष्याच्या कष्ट, बुद्धी व कार्यक्षमतेने प्राप्त होते आणि हे आहे तोपर्यंत तीचा ऱ्हास होत नाही. श्रम, बुद्धी आणि कार्यक्षमतेच्या अभावामुळे ती साथ सोडते. मूळ बाब श्रम, बुद्धिची कार्यक्षमता टिकून रहाण्यामुळेच लक्ष्मी टिकून राहते.
0 टिप्पण्या